इंदापुर प्रतिनिधी :
पुणे जिल्ह्यामध्ये इंदापूर तालुका हा कोरोना रुग्णांच्या मृत्यूदरामध्ये शहराचा दुसरा क्रमांक असून तालुक्याचा सहावा क्रमांक आहे.ही तालुक्यासाठी निश्चितच भूषणावह बाब नसून हा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रशासनातील अधिकारी व नागरिक यांच्यामध्ये समन्वय ठेवून काम करणे गरजेचे असल्याचे मत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मांडले.
आज दि. १८ सप्टेंबर रोजी इंदापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे तातडीने आयोजित करण्यात आलेल्या कोरोना विषयक आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या आढावा बैठकीस यावेळी सिव्हील सर्जन अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य डाॅ.भगवान पवार, उपविभागिय कार्यकारी दंडाधिकारी दादासाहेब कांबळे,बारामती पोलीस उपविभागीय अधिकारी नारायण शिरगांवकर, तहसीलदार सोनाली मेटकरी,गटविकास अधिकारी विजयकुमार परिट, नगराध्यक्षा अंकिता शहा, मुख्याधिकारी डाॅ.प्रदीप ठेंगल उपस्थित होते.
राज्यमंत्री भरणे पुढे म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर ग्रामीण मध्ये ३.२२ इतका असून शहरात मात्र हा मृत्यूदर ५.५५ एवढा आहे. यामुळे प्रशासनाने हा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करावा. नागरिकांनीही प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी आ. भरणे यांनी जनतेला केले.
ते पुढे म्हणाले की, माझे कुटुंब माझी जबाबदारी हा उपक्रम सुरुवातीला इंदापूर नगरपरिषदेमार्फत राबविण्यात आला असून तालुक्यातील काही हॉटस्पॉट असलेल्या गावांमध्येही या अभियानाची या जनता कर्फ्यूमधे सुरुवात केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी त्यांनी प्रशासनाचे कौतुक केले.
शासनाच्या "माझे कुटुंब, माझी जबाबदारी" या अभियानात तालुक्यातील सर्व गावातील नागरिकांच्या कुटुंबियांची तपासणी केली जाणार असून,पहिल्या टप्प्यात जास्त रुग्णसंख्या असलेल्या गावामध्ये सर्वेक्षण करण्यात येणार आहे. हे काम सध्या सुरु झाले आहे. दुसर्या टप्प्यात उरलेल्या सर्वच गावातील नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यादरम्यान नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे.लक्षणे आढळून आल्यास त्वरीत तपासणी करुन घ्यावी.घरातील वयोवृद्धांची काळजी घ्यावी.गाफील राहू नये.शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.
कोरोनाच्या कालावधीत सर्वच जण आपली जबाबदारी योग्य रितीने पार पाडत आहेत. काही ठिकाणी त्रुटी असतील त्या दूर कराव्यात. तालुक्यातील वालचंदनगर येथील कोविड सेंटर येत्या सोमवारपासून सुरु करणार असून, भिगवण येथे सेंटरलाईज ऑक्सिजन व्यवस्था दोन दिवसात सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या आढावा बैठकीमध्ये डाॅ.एकनाथ चंदनशिवे,डॉ.सुहास शेळके,डाॅ.मिलिंद खाडे,इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक नारायण सारंगकर,वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक दिलीप पवार, भिगवण पोलिस ठाण्याचे जीवन माने,तालुका वैद्यकीय अधिकारी प्रशांत महाजन,इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा,माजी नगरसेवक श्रीधर(भाऊ)बाब्रस,तालुका रुग्ण कल्याण समितीचे सदस्य महेंद्र रेडके, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील,नगरसेवक पोपट शिंदे, स्वप्निल राऊत,दादासाहेब सोनवणे,बाळसाहेब ढवळे,संजय दोशी,अशोक मखरे,, राजेंद्र चौगुले,सागर मिसाळ यांनी आपली मते मांडली.
==============================
-----------------------------------------------
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा