शिक्षक दिन विशेषतः
इंदापूर : प्रतिनिधी
प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शिक्षकांचे योगदान मोठे असून अनेक प्रसंगामध्ये,व्यवहारांमध्ये शिक्षक मार्गदर्शक म्हणून कार्यरत असल्याचेे मत इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा व्यक्त केले.
आज (दि.५ रोजी) शिक्षक दिनानिमित्त इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने भार्गव परिसरात आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक सन्मान कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी कोविड-१९ सर्वेक्षणात सहभागी होवून आपले योगदान देणार्या शिक्षकांचा नगराध्यक्षा अंकिता शहा,मुख्याधिकारी डॉ.प्रदीप ठेंगल,इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांच्या हस्ते मास्क,रुमाल व गुलाबाचे फुल देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्षा अंकिता शहा म्हणाल्या की,इंदापूर नगर परिषदेमार्फत दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान करण्यात येतो.यावर्षीही हा कार्यक्रम आयोजित केला आहे.यंदा इंदापूर शहरात कोरोनाच्या महामारीचे संकट आहे.या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांच्या कुटुंबांच्या आरोग्याच्या विषयी सर्वेक्षण करण्यात आले आहे.यामध्ये १०४ शिक्षकांनी सहभाग नोंदवला आहे.
आपण सर्वांनी कुटुंबाची काळजी घेवून या कोरोना संकटावर मात करुयात असे त्यांनी सांगितले.
मुख्याधिकारी डॉ.प्रदीप ठेंगल यांनी सांगितले की,मी देखील पी.एचडी. केली असल्याने शिक्षणक्षेत्राशी संबंधित माझा अनुभव आहे.समाज विकासामध्ये शिक्षकांचे कार्य उल्लेखनीय आहे.कोरोना संदर्भातील सर्वेक्षणात शिक्षकांनी सहभाग घेऊन समाजाप्रती आपले योगदान दिले असल्याचे ते म्हणाले.
यावेळी प्रवीण धाईंजे,सुनील मोहिते,सुरेश सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी प्रशासकीय अधिकारी वर्षा क्षिरसागर उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अल्ताप पठाण यांनी केले. सूत्रसंचालन सुभाष ओव्हाळ यांनी केले. तर आभार गायकवाड यांनी मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा