इंदापूर : प्रतिनिधी 
इंदापूर तालुक्यात मंगळवारी दि. १३ रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास पावसाची सुरुवात झाली. बुधवारी दि. १४ रोजी थोडीशीही विश्रांती न घेता पाऊस सुरुच राहिला. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पावसाने दमदार सुरुवात केली. इंदापूर शहर व तालुक्यात ढगांच्या आवाजासह अतिवृष्टी.... नव्हे.. ढगफुटीच झाली. 
पावसाचा वेग प्रचंड असल्याने ओढे-नाले, तलाव पाण्याने भरुन वाहू लागले. जुना पुणे- सोलापूर महामार्गावरील हॉटेल स्वामीराज समोरील रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नवीन इमारती भोवती पाण्याचे तळे झाले. शहरातील शंभर फुटी रस्ता व त्या लगतचे शॉपिंग सेंटरही पूर्णपणे पाण्याखाली गेले होते. प्रशासकीय इमारतीसमोर पाण्याचे तळे झाले होते. एसटी स्टँड परिसरात असणाऱ्या शॉपिंग 
सेंटरमधील तळमजल्यात साधारणतः पाच फूट पाणी साचले होते. त्यामुळे तेथील व्यापारी बंधूंचे नुकसान झाले. शहरातील सरस्वतीनगर, राजेवलीनगर, शाहूनगर, क्रीडा संकुल, सोनाई बजाज शोरुम, जाधव वस्ती भागातून आलेले पाणी, बायपास कडून आलेले पाणी व शेतातून आलेले पाणी यामुळे श्रीराम चौकातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले होते. हे पाणी पठाण यांच्या शेतातून वाहत मालोजीराजे यांच्या गढीच्या बाजूने पुढे असलेल्या डॉ. पंकज गोरे व डॉक्टर कर्डिले यांच्या हॉस्पिटलमध्ये घुसले व तेथ तळे तयार झाले.
दुसऱ्या बाजूला तारेची शाळा परिसरातून पोरापोरांची चावडी पासून पाण्याचे लोंढे थेट रामोशी गल्लीतून, आंबेडकर नगर पर्यंत पोहोचले. 
भार्गवराम तलाव जवळपास बारा वर्षानंतर पाण्याने भरला.तळ्यात येणाऱ्या पाण्याचा वेग प्रचंड असल्याने मातीचा भरावा फुटून पाणी चाँदशाहावली रस्त्यावरुन तुडुंब वाहत पंधारनाला परिसरातील पोहचले. याठिकाणी नदीचे स्वरुप आले होते. ज्या बाजूला उतार आहे. त्या बाजूला पाण्याचा प्रवाह वाहत गेल्याने अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले.
 तसेच इंदापूर शहरात असलेल्या इंदापूर कॉलेज च्या परिसरातील मोठ्या प्रमाणात पाण्याचे लोंढे येत होते. हे पाणी जुन्या पुणे - सोलापूर  वरुन वाहत होते. चाळीस फुटी रस्त्यावरून हे पाणी वाहत जावून दर्गा मशिद चौकात तळे बनले. या भागातही पाणी वाहत पुढे आंबेडकर नगर पर्यंत पोहोचले. या परिसरात अनेक भागांतून पाणी येवून संगम तयार झाला.
या अतिवृष्टीमुळे रामोशी गल्लीतील काही घरांची पडझड झाली. साठेनगर, बुद्ध विहार हा परिसर जलमय झाला. इंदापूर शहरातील अर्धा भाग पाण्याखाली गेला होता.
विशेष म्हणजे इजगुडे पेट्रोल पंपासमोर उभी असलेली ॲम्बुलन्स पाण्यासोबत वाहत पंधारा नाल्यापर्यंत आली होती. तसेच राजीव नगर पूर्णपणे पाण्याखाली गेले होते. तापी व विमल हाऊसिंग सोसायटीमध्येही सहा फुटांपेक्षा जास्त पाणी साचले. त्यामुळे पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या लोकांना स्थलांतरित व्हावे लागले. या हाऊसिंग सोसायटीत मधील वीजचे मीटर सुद्धा पाण्याखाली गेले होते.
नगरपालिका प्रशासनाने या भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठविण्यात आले. इंदापूर शहरातील नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरु केले. 
शहरातील मुकुंद शहा, नगरसेवक कैलास कदम, बाळा ढवळे, राहुल मखरे, जावेद शेख, प्राध्यापक अशोक मखरे, शिवाजी मखरे, संदिपान कडवळे, बाळासाहेब सरवदे, दादा सोनवणे, उमेश ढावरे आदी नागरिकांसह मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल, पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी तातडीची मदत केली.

" नगरपरिषदेचे कर्मचारी श्री. नाळे थोडक्यात बचावले... 

शहरातील श्रीराम चौकात असलेल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर पूराचे पाणी वाहत होते. त्यावेळी काही कामासाठी गेलेले नगरपालिकेचे कर्मचारी अंबादास नाळे पूराच्या पाण्यात  वाहत चालले असता त्यांना होमगार्ड संग्राम माने व सचिन भिसे या जवानांनी वाचवले."

"नागरिक सुरक्षित स्थळी स्थलांतरीत.. 

अतिवृष्टीमुळे शहरात चोहीकडे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. अनेक नागरिकांच्या घरात, सोसायटींमध्ये पाणी शिरले होते. पूराचे पाणी शिरलेल्या तापी हौसिंग सोसायटीमधील रहिवाश्यांच्या सुरक्षतेकरिता नगरपरिषदेने तात्काळ येथील रहिवाश्यांना स्थलांतरीत करण्यात आले.तसेच रामोशी गल्लीमधील नागरिकांनाही रोहिदास मंदिरात स्थलांतरित केले."

====================================

टिप्पण्या