मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आघाडी सरकारचे प्रामाणिक प्रयत्न सुरु : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे.
मराठा आरक्षणास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा जाहिर पाठिंबा.
इंदापूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे आरक्षणाचा विषय हाताळत आहेत. न्यायालयामध्ये सरकारच्या वतीने कोणती भूमिका मांडायची? याची टिप्पणी तयार करण्याचे काम सुरु असून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी महाविकास आघाडीचे सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असल्याचे मत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यमंत्री भरणे यांच्या निवासस्थानासमोर आज (दि.२) अॉक्टोंबर केलेल्या आक्रोश आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी वरील मत मांडले.
ते पुढे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षणाची गरज असून इंदापूर तालुक्याचा लोकप्रतिनिधी व राज्याचा राज्यमंत्री या नात्याने मराठा समाजाची भूमिका सरकारकडे ठामपणे मांडणार असल्याचे सांगून आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आरक्षणाचा पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी उपस्थित आंदोलनकर्त्यांना सांगितले.
यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणास जाहिर पाठिंबा दिला. तश्या आशयाचे पत्र आंदोलनकर्त्यांना देण्यात आले.
या आक्रोश आंदोलनात मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक पवन घोगरे यांनी सांगितले की,न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे राज्यभरामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या भावना सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी आंदोलने करण्यात येत असून आज राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घरासमोरही आक्रोश आंदोलन केले असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, कोपर्डी घटनेतील आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी, राज्य सेवा आयोगाच्या सन २०१९ च्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सुरक्षित करावे तसेच इंदापूर तालुक्यामध्ये सुद्धा मराठा समाजावर अन्याय,अत्यावर होत असून याविषयी एक समिती नेमण्यात यावी. या मागण्यांसह आमच्या चौदा मागण्या असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, तालुक्यातील भिगवण याठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने येत्या ४ अॉक्टोंबर रोजी रास्ता रोको करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यापुढील आंदोलने ही तीव्र स्वरुपाची होणार असून होणार्या परिणामाला,घटनेला सर्वस्वी राज्यसरकार जबाबदार राहील असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
===================================
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा